भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे ११ जानेवारीला आईबाबा बनले. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अनुष्काने गोंडस मुलीला जन्म दिला. विराट आणि अनुष्काने हि बातमी शेअर केल्यानंतर त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला.
अनुष्का आणि बाळाची तब्येत उत्तम असल्याची माहिती विराटने दिली आहे. विराट अनुष्काच्या चाहत्यांना बाळाची आणि त्याच्या आईची झलक पाहण्याची ओढ आता लागली आहे. पण विराटने मात्र चाहत्यांना विनंती केली आहे कि सध्या त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर केला जावा.
दरम्यान आता अशी माहिती समोर आली आहे कि विराटने अनुष्का आणि बाळाच्या सुरक्षेसाठी आपल्या जवळच्या नातेवाईकांनाही भेटण्यापासून रोखले आहे.
विराटने जवळच्या नातेवाईकांनाही अनुष्का आणि बाळाला रुग्णालयात भेटण्याची परवानगी दिलेली नाही. सोबतच विराट आणि अनुष्काने इस्पितळातून कोणाकडूनही फुलं किंवा भेटवस्तू न घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड वातावरणात दोघांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
एवढेच नाही तर बाळाचे आणि आईचे फोटो बाहेर येऊ नये म्हणून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना देखील सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयात आजूबाजूच्या रूममध्ये असणाऱ्या लोकांना देखील या मुलीची झलक दिसू नये अशी सोय करण्यात आली आहे. दरम्यान मीडियाच्या फोटोग्राफरनी रुग्णालयाच्या बाहेर मोठी गर्दी केलेली आहे.
त्यांची हि गर्दी बघून अनुष्का आणि मुलीला मागच्या दाराने घरी पाठविण्याचा विचार केला जात असल्याचेही म्हटले जात आहे. ११ डिसेंबर २०१७ रोजी विराट आणि अनुष्का यांनी इटलीत लग्न केले होते. त्यावेळी मध्यप्रदेशच्या कटनी येथे राहणाऱ्या विराटच्या काकू आशा कोहली यांनी सांगितल्याप्रमाणे, विराटने त्यांना किंवा त्यांच्या कुठल्याही नातेवाइकाला निमंत्रण पाठवले नव्हते.