पोलीस भरतीबाबत उमेदवारांनी तयार रहावे; सरकारकडून लवकरच ‘गुड न्यूज’

महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून एका मागून एक नैसर्गिक संकट येत आहे. पहिले कोरोना महामारी, नंतर चक्रीवादळ आणि आता महापूर अश्या नैसर्गिक संकटांमुळे महाराष्ट्रात मोठे नुकसान झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी खात्यांमध्ये होणाऱ्या भरती प्रक्रिया देखील रखडल्या आहेत.
आता लवकरच रखडलेली पोलीस भरती सुरु होणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये ऑफलाईन लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यापूर्वी पोलीस भरतीचे स्वरूप पूर्णतः वेगळे होते. आजवरच्या पोलीस भरतीत प्रारंभी मैदानी चाचणी होत असायची, मात्र आता नव्या प्रणालीनुसार अगोदर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेतून पात्र होणाऱ्या उमेदवारांची नंतर मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.
याबाबत सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर यांनी माहिती दिली आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये पोलीस शिपाई, राज्य राखीव पोलीस दल व पोलीस वाहन चालक अशा ५२०० पदांसाठी अर्ज भरून घेण्यात आले होते. मात्र त्यानंतर महापोर्टल रद्द होणे, महाराष्ट्रातील सरकार बदल, कोरोना आणि आरक्षण या कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती.
आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबतचे शुध्दीपत्रक पोलीस खात्याकडून प्रसिद्ध करण्यात आल्याने राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणारे उमेदवार आता अभ्यासाच्या तयारीला लागले आहेत. पहिल्यांदा होणारी लेखी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी एस. ई. बी. सी म्हणजेच (मराठा उमेदवार) फॉर्म भरला होता त्यांना खुला प्रवर्ग अथवा ई. डब्लू. एस (आर्थिकदृष्ट्या मागास) यापैकी एक विकल्प निवडण्याची संधी दिली आहे.
सदर विकल्प निवडण्यासाठी कालावधी ५ ते १५ ऑगस्ट असा ११ दिवसांचा असणार आहे. ई. डब्लू. एस चे प्रमाणपत्र ही २०१८-१९ व २०१९-२० या परीक्षांसाठी मार्च २०२० पर्यंतचे असणे आवश्यक आहे.
वरील सर्व गोष्टींचा विचार करत उमेदवारांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून येणाऱ्या भरतीला सामोरे जावे. उमेश रुपनवर म्हणाले की महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून आयुक्तालये, ग्रामीण परीक्षेत्रे, एस. आर. पी चे ग्रुप व रेल्वे विभाग या सर्व युनिटमध्ये भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी पोलीस विभागाकडून माहिती जाहीर करण्यात आली आहे