बातम्या

आश्चर्यजनक! मीराबाई चानूच्या पदकाचा रंग सोनेरी होण्याची दाट शक्यता

टोकियो ऑलिम्पिक २०२१मध्ये भारताला मीराबाई चानूच्या रूपाने पहिले रौप्यपदक मिळाले आहे. मात्र आता रौप्यपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूला आणखी एक सुखद धक्का मिळण्याची शक्यता आहे. सुवर्णपदक मिळवलेल्या चीनच्या झियु हौ ही डोपिंग चाचणी मध्ये दोषी आढळून आली आहे. आता तिची आणखी एक चाचणी होणार आहे आणि यामध्ये जर ती दोषी आढळली तर मीराबाईच्या पदकाचा रंग सोनेरी होणार आहे.

महिलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये चीनच्या झीयूने मीराबाईपेक्षा सरस कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले होते. मात्र तिची डोपिंग चाचणी होणार असल्या कारणाने मीराबाईला कोणत्याही क्षणी आनंदाची बातमी मिळू शकते. यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू पैलवान योगेश्वरदत्त याला कांस्यपदक मिळाले होते आणि त्याच वजनगटातील सुवर्णपदक पटकावणारा डोपिंगमध्ये दोषी आढळला होता.

जर चीनची झीयु डोपिंग चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आली तर ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी मीराबाई चानू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरणार आहे. मीराबाईने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले आहे. तिने पदक मिळवताना २०२ किलो वजन उचलले होते. तसेच ८७ किलो स्नॅच प्रकारात तर ११५ किलो क्लीन अँड जर्क प्रकारात वजन उचलले आहे.

वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळवण्याच्या बाबतीत भारतीय खेळाडूने मिळवलेले हे दुसरे पदक ठरले आहे. चानूने भारताच्या २९ व्या ऑलिम्पिकपदकाची नोंद केली आहे. कर्नम मल्लेश्वरीने सिडनीच्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय खेळाडूने मिळवलेले हे दुसरे पदक आहे.

मीराबाई चानू टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवल्याने रातोरात स्टार बनली आहे. मात्र तिने स्वतः हे स्टारडम नाकारले असून भारताला भविष्यात अनेक गुणवान खेळाडू देण्यासाठी सज्ज राहणार असल्याचे सांगितले आहे.

यापुढच्या ऑलिम्पिकमध्ये ती सहभागी होणार की नाही याबाबत देखील प्रशचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र ती प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार हे मात्र नक्की आहे आणि तसे संकेत देखील तिने दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button