कोण होते भारताला पाहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे ‘नॉर्मन पिचर्ड’?

नुकतंच टोकियो ऑलिम्पिक २०२० पार पडलं. जगातील सर्वात पहिले ऑलिम्पिक हे १३४ वर्षांपूर्वी सुरु झाले होते. अथेन्सपासून सुरु झालेला आधुनिक ऑलिम्पिक खेळांचा प्रवास आता थेट टोकियोपर्यंत पोहोचला आहे. भारताने पहिल्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला नव्हता. मात्र १९०० साली सुरु झालेल्या दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारताने भाग घेतला होता आणि तिथूनच भारताचा ऑलिम्पिकमधला प्रवास सुरु झाला होता.
१९०० साली भारत स्वतंत्र नव्हता. त्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. त्याकाळी ब्रिटिश सैनिकांनी भारतीयांना स्वतःपेक्षा खूप खाली मानले होते. हेच कारण होते जेव्हा त्यांनी दुसऱ्या ऑलिम्पिकसाठी भारताकडून ब्रिटनच्या नॉर्मन गिल्बर्ट प्रिचर्ड यांची निवड केली होती.
१९०० साली सुरु झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडून सहभागी होणारे नॉर्मन प्रिचर्ड हे एकमेव खेळाडू होते. याच ऑलिम्पिकमधून भारताचा पदकाचा प्रवासही सुरु झाला होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नॉर्मन प्रिचर्ड यांनी २०० मीटर अडथळा आणि २०० मीटर डॅश स्पर्धेत प्रत्येकी १-१ रौप्य् पदक जिंकले आणि अशी कामगिरी करणारे ते पहिले आशियाई वंशाचे खेळाडू ठरले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांनी पाच स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. त्यातील तीन स्पर्धांच्या अंतिम फेरीपर्यंत त्यांनी मजल मारली होती. ६० मीटर, १०० मीटर, २०० मीटर, १०० मीटर हर्डल रेसमध्ये आणि २०० मीटर हर्डल रेसमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता. यातील दोन प्रकारात त्यांना यश मिळाले होते.
नॉर्मन प्रिचर्ड हे ब्रिटिश नागरिक होते. त्यांचा जन्म २३ जानेवारी १८७५ रोजी कोलकाताच्या अलिपूर येथे झाला. त्यांचे वडील जॉर्ज पीटरसन प्रिचर्ड हे लेखपाल होते. प्रिचर्ड यांनी कोलकाता येथील सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. नंतर त्यांनी शहरातील एका नामांकित बर्ड अँड कंपनीत नोकरी केली होती.
असे असले तरी ऑलिम्पिक इतिहासकार इयान बूकानन यांच्या मते नॉर्मन प्रिचर्ड हे भारतीय ध्वजाखाली ऑलिम्पिकमध्ये उतरले नव्हते. ते एक व्यक्ती म्हणून ऑलिम्पिकमध्ये उतरले होते. मात्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अजूनही नॉर्मन प्रिचर्ड यांनाच भारतीय खेळाडू मानते आणि त्यांच्या दोन्ही ऑलिम्पिक पदकाचे श्रेय भारत देशाला देते.