Breaking News
Home / प्रेरणादायी / ..म्हणून चक्क शेतकऱ्याने शेतात आपल्या बैलाचे स्मारक उभारले आहे!

..म्हणून चक्क शेतकऱ्याने शेतात आपल्या बैलाचे स्मारक उभारले आहे!

बैल हा शेतकऱ्याचा एक घरातील सदस्यासारखाच असतो. शेतकरी आपल्या बैलांची जीवापाड काळजी घेतात. बैलपोळा हा सण खास बैलांसाठी शेतकरी साजरा करतो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाची खूप उत्साहात पूजा करून त्याची वाजत गाजत मिरवणूक या निमित्ताने काढली जाते. बैल हा शेतकऱ्याच्या खूप जवळचा बनून जातो.

बैल आणि शेतकऱ्याचे प्रेम कशाप्रकारचे असते याचा प्रत्येय येणारी एक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यती खूप प्रसिद्ध आहेत. येथे बैलगाडा शर्यतीला खूप महत्व असते. बैलगाडा शर्यतीमध्ये तर असणारे बैल हे खूप प्रसिद्ध असतात. त्यांची किंमत देखील लाखांमध्ये असते. हे बैल शर्यतीत धावून आपल्या मालकाला एक नावलौकिक मिळवून देत असतात.

अशाच एका शेतकऱ्याला नावलौकिक मिळवून दिलेल्या बैलाचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूने त्या शेतकऱ्यावर आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या बैलाचे नाव संज्या होते. संज्याचा जन्म अहमदनगर मधील पठारवाडी येथे झाला होता. तो एक वर्षाचा असतानाच त्याला कांताराम पठारे यांनी विकत घेतले. संज्या १७ वर्षाचा होता. त्याने या १७ वर्षात पुणे जिल्ह्यातील खूप शर्यती गाजवल्या.

अनेक शर्यतीमध्ये तो नंबर एकच मानकरी ठरला. यामुळे त्याचेच नाही तर मालक पठारे यांचे देखील नाव खूप प्रसिद्ध झाले. फुलगाव येथील शर्यतीत तर त्याने हिंदकेसरी हा मानाचा किताब पटकावला होता. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून पठारे यांचे नाव घरोघरी पोहचले. पण याच संज्याने आता जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे पठारे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पण पठारे कुटुंबाने देखील त्याचे हे ऋण फेडले आहे. संज्याला पठारे यांनी माणसाप्रमाणे निरोप देत दशक्रिया विधी केला. त्यांनी मुंडन करून दुखवटा देखील पाळला. २०१३ पासून बैलगाडा शर्यती बंद आहेत. अनेकांनी आपले बैल विकले होते पण पठारे यांनी तसे केले नाही.

कांताराम पठारे हे खरेदी येथील शेतकरी आहेत. पठारे कुटुंबाने आपल्या लाडक्या संज्याचे मरकळ (ता.खेड) येथील त्यांच्या शेतामध्ये त्याचे स्मारक देखील उभे केले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *