Breaking News
Home / राजकिय / खडसेनंतर ‘या’ केंद्रीय मंत्री राहिलेल्या नेत्याने २ ओळीत राजीनामा देत भाजपला ठोकला रामराम!

खडसेनंतर ‘या’ केंद्रीय मंत्री राहिलेल्या नेत्याने २ ओळीत राजीनामा देत भाजपला ठोकला रामराम!

सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीच्या पूर्वी भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. या धक्क्यातून भाजप अजून सावरलाच नाही तर आता अजून एक मोठा धक्का बसला आहे. भाजपचे मोठे नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.

जयसिंगराव गायकवाड हे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज होते. त्यांनी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे २ ओळीच्या राजीनाम्याचे पत्र पाठवले. एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे ते देखील आता राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे.

जयसिंगराव गायकवाड हे माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री, माजी सहकार राज्यमंत्री, २ वेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार तर ३ वेळा बीडचे खासदार राहिले आहेत. जयसिंगरावांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात भारतीय जनसंघापासून केली होती. त्यांनी मधल्या काळात भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश देखील केला होता.

नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर ते पुन्हा घरवापसी करत भाजपमध्ये परतले होते. सध्या ते भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य होते. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जयसिंगराव हे सक्रिय राजकारणापासून दूर होते. त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती.

उमेदवारी न मिळाल्याने अखेर त्यांनी मराठवाडा विभागातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, त्यासोबतच भाजपाला रामरामही ठोकला.

जयसिंगराव गायकवाड हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय होते. मराठवाड्यात भाजपच्या विस्तारासाठी त्यांनी मोठे काम केले आहे. ते भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीसही होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *