धक्कादायक बातमी! सर्वांच्या अथक प्रयत्नानंतरही पुण्यातील चिमुरडी वेदिका शिंदेने सोडला जीव

पुण्यातील चिमुरडी वेदिका शिंदे एका जनुकीय आजाराने त्रस्त होती. तिला spinal muscular atrophy हा जनुकीय आजार जडला होता. तिच्यावर उपचार करण्यासाठी १६ कोटी रुपये लोकवर्गणीतून जमा करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने १ ऑगस्ट रोजी सायंकाळी वेदिकाची प्राणज्योत मावळली आहे.
ती खेळत असताना तिला श्वास घेण्यात त्रास जाणवू लागला आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टर देखील तिचे प्राण वाचवू शकले नाही. वेदिकावर उपचार व्हावेत म्हणून तिला १६ कोटींच्या इंजेक्शनची गरज होती. तिच्या घरच्यांनी मिळून तसेच अनेक सामाजिक संघटनांनी तिच्यासाठी रक्ताचे पानी करत लोकवर्गणी केली आणि १६ कोटी रुपये जमवले.
पुण्याच्या खासगी रुग्णालयातून जून महिन्यामध्ये वेदिकाला झोलगेस्मा नावाची लस देण्यात आली होती. मात्र एवढे सारे करूनही तिचे प्राण वाचू शकले नाहीत. सगळ्यांनी तिच्यासाठी प्रार्थना करूनही वेदिकाचा जीव वाचला नाही याबाबत अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
वेदिका पाच महिन्यांची असताना तिला SMA टाईप १ या जनुकीय आजारानं ग्रासल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे वय वाढण्याबरोबरच तिच्या शरीरातील एक एक अवयव निकामी होत होता. त्यामुळे या आजारावर लवकरात लवकर उपचार करणे गरजेचे होते.
SMA टाईप १ या जनुकीय आजारासाठी फक्त झोलगेस्मा ही एकमेव लस उपलब्ध आहे. पण या लसीची किंमत तब्ब्ल २२ कोटी होती. असं असताना देखील तिच्या आई-वडिलांनी हार न मानता लोकवर्गणीसाठी अथक प्रयत्न केले. सोशल मीडिया माध्यमातून अनेक सामाजिक संघटनांनी लोकांना मदतीचे आव्हान केले होते.
शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील लोकांकडे मदतीचे आव्हान केले होते आणि मदत मिळाल्यानंतर देखील लोकांचे आभार मानले होते. १६ जून रोजी वेदिकाला इंजेक्शन दिल्यानंतर सगळ्यांचा आनंदाला पारा उरला नव्हता. मात्र अचानक पुन्हा त्रास सुरु झाल्यानं वेदिकाची प्राणज्योत मावळली आहे.