असं म्हटलं जातं की, नातं सुरू करण्यासाठी काही निश्चित वय नसतं आणि हे नातं आयुष्यभरासाठी जोडले जात असेल तर ती गोष्ट आणखीनच खास बनते. असेच नाते महाराष्ट्रात सुरू झाले आहे, जे आज लोकांमध्ये एक उदाहरण बनले आहे. खरं तर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात एका अतिशय खास लग्नाचं आयोजन करण्यात आलं, ज्यात वराचं वय 79 आणि वधूचं वय 66 आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज शहराजवळील आस्था बेघर महिला केंद्रात हा खास विवाह पार पडला. जिथे दोघांनीही आयुष्याची दुसरी इनिंग सुरू केली आहे. सर्व रूढी मोडून, त्यांच्या बेघर साथीदारांच्या उपस्थितीत हा विवाह प्रत्यक्षात पार पडला.
लग्नाला दोघांचे नातेवाईक, ग्रामस्थ व संस्थेचे इतर सदस्य उपस्थित होते. जुन्या विचारसरणीला फाटा देण्याचे एक चांगले उदाहरण म्हणून आज लोक या लग्नाकडे पाहत आहेत.
६६ वर्षीय वधू शालिनी यांचा विवाह ७९ वर्षीय दादासाहेब साळुंखे यांच्याशी झाला आहे. कोरोनाचे सर्व नियम लक्षात घेऊन हा अनोखा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. विवाह सोहळ्यात विधींचे पालन करण्यात आले आणि दोघांनीही वयाचे बंधन झुगारून एकमेकांना पुष्पहार घातला.
पुष्पहार घातल्यानंतर दोघांनीही महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस नमन करून आशीर्वाद घेतले. इतकंच नाही तर विवाह सोहळ्यात शालिनी आणि दादासाहेबांनी एका रोपाला सिंचन करून पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला.
दोघेही एकटेपणाशी झुंज देत होते
पुण्यातील रहिवासी असलेल्या शालिनी पाशन आपले जीवन आनंदाने जगत होत्या पण अचानक त्यांचा मुलगा आणि पतीचे अकाली निधन झाल्याने त्या पूर्णपणे एकट्या पडल्या. यानंतर शालिनीचे आयुष्य पूर्णपणे एकटे झाले आणि तिने बेघर महिलांच्या आश्रमात जाऊन आपले उर्वरित आयुष्य येथे घालवण्याचा निर्णय घेतला.
तर मूळचे तासगावचे रहिवासी असलेले दादासाहेब साळुंखे हे सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर ते पूर्णपणे एकटे पडले होते. या दरम्यान दादासाहेब साळुंखे यांची मुले त्यांच्या आयुष्यात पूर्णपणे व्यस्त होती तर दादासाहेब साळुंखे यांना या एकटेपणातून बाहेर पडायचे होते.
त्यानंतरच दादासाहेब साळुंखे आस्था बेघर महिला केंद्राच्या संपर्कात आले आणि त्यानंतर त्यांची शालिनीशी भेट झाली. शेवटी दादासाहेब साळुंखे यांनी त्यांच्या मुलांशी याबद्दल बोलून त्यांच्या मुलांनी त्यांच्या लग्नाला आनंदाने होकार दिला आणि हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला.