घरातून बाहेर पडताना आणि परत येताना वडील दिसले पाहिजे म्हणून मुलांनी बनवलं वडिलांचं स्मारक

शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, पण तोच शेतकरी एका कुटुंबाचा ही पालनकर्ता असतो. या महाराष्ट्रात किंबहुना या भारत देशात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था हा चिंतेचा विषय आहे..! पण प्रवाहाच्या, प्रशासनाच्या, नियतीच्या, निसर्गाच्या विरोधात दंड थोपटून उभा असणारा हा शेतकरीच असतो..!
काल पाचगणीतील खिंगर या गावी एक भावनिक ओलाव्यांचा कौतुकांचा सोहळा पाहण्याचं भाग्य याची देही याची डोळा लाभले!!! स्वर्गीय किसन दौलती दुधाने उर्फ भाऊ यांचं हृदयविकाराच्या झटक्याने एक वर्षांपूर्वी दुःखद निधन झालं होतं, मागील महिन्यातच त्यांना जाऊन वर्ष झाले त्यानिमित्त वर्ष श्राद्ध व इतर धार्मिक विधी करण्यात आले. त्यांच्या पाश्चात पत्नी व तीन मुले असा भरलेला संसार होता. अत्यंत गरीबीतून वर येऊन आपल्या तीनही मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊन स्वावलंबी व स्वाभिमानी ‘भाऊ’ यांनी बनवलं होतं, आपले जीवनात अनेक राजकीय पदे ‘भाऊंकडे’ होती. ग्रामपंचायत ते कृषी उत्पन्न बाजार समिती असा थोडक्यात राजकीय प्रवास. अनेक सामाजिक संस्था व समित्या यांवरही ‘भाऊ’ होतेच..! मुख्य म्हणजे एक उत्कृष्ट शेतकरी आणि शेतीतील उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं जावळी, महाबळेश्वर ,वाई तालुक्यात शेतीचा तज्ञ म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख आदराने केला गेला.
डोंगर उतारावर शेती कशी करावी ? त्याचं तंत्रज्ञान कसं विकसित करावं ? त्यासाठी प्रशासनाचे कोणत्या प्रकारे कसं साह्य घ्यावं ? याबाबत कदाचित त्यांच्यापेक्षा जास्त या पंचक्रोशीत कोणी जाणत असेल असं वाटत नाही. स्वतःची आधुनिक शेती करत असताना माझ्यासोबतचाही शेतकरी कुठेही मागे राहू नये याची काळजी कदाचित भाऊंपेक्षा जास्त कुणी केली असेल असं वाटत नाही. बाजार समितीत काम करत असताना एक तज्ञ म्हणून जावळी व महाबळेश्वर तालुक्यात शेती बाबत अनेकांना मार्गदर्शन भाऊंनी केले,व ते काल परवा पर्यंत करतच होते…!!
याची दखल राज्य सरकार व मीडिया प्रतिनिधींनी घेतली नसती तर नवल वाटले असते. महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने भाऊंना “कृषिरत्न” म्हणून सन्मानित करण्यात आलं. भाऊंकडे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मिळून १६ पदे होती, एक प्रगतशील शेतकरी म्हणून एक चढता आलेख जीवनाचा होता, पण हे करत असतानाही कुटुंबाकडे कुठेही दुर्लक्ष भाऊंकडून झाले नव्हते. एवढेच नव्हे तर आपल्या हिरा आणि कौतुक वरही भाऊंचं प्रेम, भाऊंची काळजी किंचित हि कमी झाली नव्हती.
भाऊंच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, पण भाऊंनी त्यांच्या मुलांना रडायला नाही तर लढायला शिकवलं!! भाऊंची तीनही मुलं आपापल्या क्षेत्रात भरारी घेत आहेत. अनिल उर्फ अण्णा, संजय उर्फ संजू भाऊ, धनंजय हे आपापल्या क्षेत्रात म्हणजेच शेती ,उद्योग ,अण्णांचे इतिहास संशोधन अगदी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करत आहेत. आजच्या या युगात जिथे तरुणांना आपल्या वडिलांचे नाव पूर्णपणे आपल्या नावामध्ये लावण्याची ही लाज वाटते तिथे हे तीन तरुण आपल्या वडिलांचे पूर्ण कृती स्मारक शिल्प उभं केलं! हे प्रेरणादायी आहे. अण्णांचा हट्ट होता, “मी घरातून बाहेर जाताना, मी घरी परत येताना मला माझे वडील दिसले पाहिजे” अंगावरती काटा उभा राहतो!!
आजच्या या कलियुगात असेही पुत्र आहेत. इथून मुलं परगावी, परदेशात शिक्षणासाठी व नोकरीसाठी जातात ती जातातच ! परत कदाचित वाढ वडिलांची इस्टेट हस्तगत करण्यासाठीच येतात.. पैशांसाठी नाती विसरणारा, या समाजात अशी ही मुलं आहेत आणि ती शेतकऱ्यांची मुलं आहेत याबाबत अभिमान वाटतो. असं म्हटलं जातं आयुष्याच्या शेवटी एवढे तरी कमवून जावं की, आपल्या मुलांना आपल्या बाबत लाज वाटू नये! पण एवढेही कमवून करून जाऊ नये की, आपल्या मुलांना माज येईल..! हे समीकरण भाऊंच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतं. एक पालक म्हणून मुलांना स्वावलंबी व स्वाभिमानी बनवलं त्यांच्या शिक्षणात कुठेही कच खाल्ली नाही आणि माज ? तो काय असतो ?? अण्णा, संजू भाऊ, धनंजय दादा खूप नम्र लोक!!!
वारसांनी संधी मिळते कर्तृत्व सिद्ध करावा लागते आणि ते कर्तृत्व भाऊंनी हे वेळोवेळी सिद्ध केलं आणि त्यांच्या तीनही वाघांनीही ते जीवनाच्या पदोपदी सिद्ध करत आहेत..!
हा देश संस्कारांचा आहे, हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे इथं श्रावण बाळही आहेत आणि इथे प्रभू रामचंद्र ही आहेत. ही भूमी संतांनी पवित्र केलेली आहे. काल कार्यक्रम स्थळी अनेक राजकीय, सामाजिक, शेती ,इतिहास संशोधन व इतर सर्वत्र क्षेत्रातून लोक हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी आले होते पण या भावंडांच्या व त्यांच्या माऊलींच्या डोळ्यातील पाणी कदाचित खूप कमी लोकांना दिसलं असेल.
(सदरील शिल्प श्री दीक्षित सर यांनी बनवलेला आहे अत्यंत देखणे आहे, हे शिल्प वास्तववादी वाटतं. सदरील समाधीकोश, रचनाकार श्री प्रवीण भोसले सर यांनी केलेली आहे)
लेखन सीमा..
-ॲड.अजय महादेव सोनवणे