सध्या सर्वत्र शिवजयंतीची जोरदार तयारी सुरु आहे. पण या शिवजयंतीवर सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे शिवभक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीला संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे शिवभक्त खूप नाराज झाले आहेत.
राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पण एकीकडे राजकीय पक्षांचे कार्यक्रम, मिरवणूक, उदघाटन सोहळे प्रचंड गर्दीमध्ये पार पडत आहेत. या कार्यक्रमांना मात्र प्रचंड गर्दी आहे. या कार्यक्रमांवर कुठलेही बंधन नसल्याचं चित्र सध्या आहे.
शिवजयंतीवर निर्बंध लावल्यानंतर एका शिवभक्ताने गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक खुले पत्र लिहिले आहे. वाचा काय आहे या पत्रात..
प्रति
अनिल देशमुख साहेब
गृहमंत्री महाराष्ट्र राज्य
राज्य शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना काढून शिवजयंतीबाबत काही निर्बंध आणले आहेत. या निर्बंधांमुळे गावोगावी शिवप्रेमींना शिवजयंतीच्या कार्यक्रमांना परवानगी मिळण्यास अडचणी येत आहेत.
अलीकडच्या काळात आपल्या पक्षासह इतर पक्षाच्या विविध कार्यक्रमांना मिळणारी परवानगी पाहता केवळ शिवजयंतीमध्येच हे सरकार आडकाठी आणत आहे असा शिवप्रेमींचा सार्वत्रिक समज झाला आहे. त्यामुळे कुठलीही परवानगी न घेता शिवजयंती साजरी करण्याबाबत शिवप्रेमींनी स्वतःच्या मनाची तयारी केली आहे.
सदरहू शिवजयंती साजरी करणाऱ्या शिवप्रेमींवर आकसबुद्धीने गुन्हे दाखल करु नयेत अशी आपणास विनंती आहे. प्रत्येकाला स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाची काळजी आहे, त्यामुळे सर्वजण कोविड १९ च्या नियमांचे पालन करुनच महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करतील याबाबत खात्री बाळगा. शिवजयंती साजरी केली म्हणून गुन्हे दाखल झाल्याचे एकही उदाहरण महाराष्ट्रात बघायला मिळणार नाही अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद !
जय जिजाऊ जय शिवराय.
-अनिल माने
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.