बातम्या

शिंदेंचे मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी उदय सामंत यांनी केलं एक सूचक ट्विट, पहिल्याच दिवशी मिळालं..

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांसाठी देखील हा धक्काच होता. त्यामुळेच हा सुखद धक्का असल्याचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

या शपथविधीनंतर शिंदे यांनी तातडीने मंत्रालयात जाऊन बैठक घेतली. लोकहिताची कामे आणि लोकप्रतिनिधींच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बंडखोर आमदारांनीही जल्लोष केला. यामध्ये उदय सामंत यांनी आज ट्विट करत नात्यातील जबाबदाऱ्यांची माहिती दिली.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच आपल्यासोबत असलेल्या 50 बंडखोर आमदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आमदारांचेही आभार मानले. एकनाथ शिंदे गटात केवळ आमदारच नाही तर मंत्रीही सामील झाले आहेत. अखेरच्या क्षणी मंत्री उदय सामंत यांनी शिंदे गटात सामील होत शिवसेनेला जोरदार धक्का दिला. आता मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना सुखद धक्का दिला आहे. तत्पूर्वी सामंत यांनी एक ट्विट केलं आहे. सामंतांचं हे सूचक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी नात्यांमधील जबाबदारी काय असते, हे सांगितलं आहे.

नात्याच्या एकूण पाच पायऱ्या असतात. पाहणे, आवडणे, हवे असणे आणि स्वीकारणे या चार अतिशय सोप्या पायऱ्या आहेत. मात्र, सर्वात कठीण पाचवी पायरी आहे; ती म्हणजे “निभावणे”… असे सूचक ट्विट सामंत यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदारांनी चारही पायऱ्या पार केल्या आहेत. आता, निभावणे ही सर्वात कठीण पायरी शिल्लक आहे, ती ते कशी निभावतात हेच कदाचित सामंत यांनी आपल्या ट्विटमधून व्यक्त केलंय, अशी चर्चा होत आहे.

दरम्यान, शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गोव्याला रवाना झाले. यावेळी गोव्यातील हॉटेलमध्ये शिंदे यांच्या गटातील आमदारांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले. उदय सामंत, गुलाबराव पाटील, संजय शिरसाठ, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, प्रकाश आंबिटकर, दिलीप लांडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्याचा एक फोटोही सामंत यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

सामंत यांना पहिल्याच दिवशी मिळालं गिफ्ट

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव होता. काल झालेल्या विशेष बैठकीत या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. हे महाविद्यालय सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी केली होती. पुढील वर्षापासून या नवीन शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेणे शक्य होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वत: त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली होती, हे विशेष. त्यामुळे आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती शेअर करत उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button