रतन टाटांच्या खांद्यावर हात ठेवून केक भरवणारा व्हायरल व्हिडीओ मधील तो तरुण आहे तरी कोण?

विश्वासार्हतेचं दुसरं नाव म्हणजे टाटा असं म्हटलं जातं. कंपनीचे सर्वोसर्वा रतन टाटा हे तर जगभरामध्ये त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. रतन टाटा यांनी कालच म्हणजेच २८ डिसेंबर २०२१ रोजी आपला ८४ वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा वाढदिवस साजरा करताना एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
या व्हिडीओमध्ये रतन टाटा एका खुर्चीवर बसले असून ते समोरच्या टेबलवरील छोटा कप केक कापताना दिसत आहेत. छोट्या केकवर लावलेल्या मेणबत्तीला फुंकर मारून नंतर रतन टाटा हा केक कापतात. त्यानंतर समोरच्या टेबलजवळ बसलेला तरुण रतन टाटांच्या बाजूला येऊन उभा रातो आणि त्यांच्या खांद्यावरुन मायेनं हात ठेवतो. नंतर तो खाली बसतो आणि कापलेल्या कप केकचा एक तुकडा रतन टाटांना भरवतो.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. पण या व्हिडीओत अगदी प्रेमाने रतन टाटांना केक भरवणारा हा तरुण आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर हा तरुण ३० वर्षांचा आहे. विशेष म्हणजे हा रतन टाटा यांचा कोणी नातेवाईक नाहीय असं तुम्हाला सांगितल्यास आश्चर्य वाटेल. पण मग हा तरुण आहे तरी कोण त्याच्यासोबत रतन टाटांनी वाढदिवस साजरा केला, असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. या तरुणाचं रतन टाटांसोबत खास कनेक्शन आहे. याच कनेक्शनबद्दल आपण या लेखातून जाणून घेऊयात.
तर व्हायरल व्हिडीओमध्ये रतन टाटांच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या, त्यांना केक भरवणाऱ्या तरुणाचं नाव आहे, शंतनू नायडू. शंतनू हा रतन टाटांचा पर्सनल सेक्रेट्री आहे. तसे रतन टाटा हे तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. त्यांची भाषणे, किस्से सोशल नेटवर्किंगवर कायम व्हायरल होत असतात. मात्र खूपच कमी लोकांना ठाऊक असेल की ८५ व्या वर्षात पदार्पण रतन टाटांचा पर्सनल सेक्रेट्री म्हणून काम करणारा मुलगा ३० वर्षांचा आहे.
इतकच नाही तर या तरुणाला खुद्द रतन टाटा यांनीच फोन करुन, “तू माझ्याबरोबर काम करणार का? अशी विचारणा केली होती. हो तुम्हाला हे खरं वाटणार नाही पण खरोखरच टाटांनी शंतनू नायडू या तरुणाला फोन करुन स्वत: कामाची ऑफर दिली. यासंदर्भातील शंतनूचा प्रवास सांगणारी एक पोस्ट काही वर्षापूर्वी ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ने शेअर केली होती.
‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ हे पेज फेसबुकवर प्रचंड लोकप्रिय पेजेसपैकी एक आहे. या पेजवर सामान्यातील असामान्य व्यक्तींच्या कथा अगदी रंजक पद्धतीने सांगितल्या जातात. याच पेजवरुन शंतनूची कहाणी पोस्ट करण्यात आली आणि पाहता पाहता ती व्हायरल झाली होती. यामध्ये त्याने आपली रतन टाटांशी भेट कशी झाली आणि नक्की तो काय करतो याबद्दलची माहिती दिलीय.
अशी झाली पहिली भेट
रतन टाटांशी भेट कशी झाली याबद्दल बोलताना शंतनू या सर्वांची सुरुवात कुत्र्यांबद्दल असणाऱ्या प्रेमामुळे झाल्याचं सांगितलं. “मी २०१४ मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टाटा ग्रुपमध्ये काम करु लागलो. सगळं काही छान सुरु होतं. मात्र एक दिवस अचानक ऑफिसमधून घरी जाताना मला एका कुत्र्याचा मृतदेह रस्त्याच्या मधोमध पडलेला दिसता. मला कुत्र्यांची खूप आवड आहे. मी अनेकदा कुत्र्यांना वाचवलंही होतं. त्यामुळे तो मृतदेह पाहून मला खूप दु:ख झालं. मी तो मृतदेह रस्त्यावरुन बाजूला घेण्याचा विचार करत होतो आणि तितक्यात एक गाडी त्या मृतदेहाला चिरडून निघून गेली त्यावेळी मला अगदी कसंतरी वाटलं. मला याबद्दल काहीतरी करावं लागेल याची जाणीव झाली. त्यामुळे मी माझ्या काही मित्रांना फोन केला आणि ‘कॉलर रिफलेक्टर’ तयार केला. त्यामुळे हे रिफलेक्टर गळ्यात असणारे कुत्रे वाहन चालकांना खूप लांबूनही दिसतील. हे रिफलेक्टर काम करेल की नाही मला ठाऊक नव्हतं. मात्र दुसऱ्याच दिवशी मला फोन आला आणि या कॉलरमुळे एका कुत्र्याचा जीव वाचल्याचे मला समोरच्याने सांगितले. तेव्हा मला खूप आनंद झाला.माझ्या कामाची खूप चर्चा झाली आणि टाटा ग्रुपच्या कंपन्यांच्या वृत्तपत्राने माझ्या कामाची दखल घेतली. अनेकांना या रिफलेक्टर कॉलर विकत घ्यायच्या होत्या मात्र आमच्याकडे त्या तयार करण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला एक सल्ला दिला. टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनाही कुत्र्यांबद्दल भरपूर प्रेम आहे त्यांना तू पत्र लिहून याबद्दल कळव असं मला वडिलांनी सुचवलं,” असं शंतनुने सांगितलं.