मुख्यमंत्री शिंदे आमदार खासदारांसह गुवाहाटीला रवाना, या ६ आमदारांनी जाणे टाळल्याने चर्चाना उधाण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक मंत्री, आमदार, खासदारांसह शनिवारी सकाळी विशेष विमानाने गुवाहाटीला रवाना झाले आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांसह मंत्री, आमदार आणि खासदारांचे कुटुंबीयही सहभागी होणार आहेत. हे सगळे कामाख्या देवीचे दर्शन घेणार असून आसाम सरकारचा पाहुणचारही घेणार आहेत. रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्काम असणार आहे.
गुवाहाटील रवाना होण्याआधी एकनाथ शिंदे यांनी विमानताळावर माध्यमांशी संवाद साधला. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं. आम्ही गुवाहाटीवरून घाई गडबडीत आलो होतो. त्यामुळे आता आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणानुसार जात आहे. श्रद्धेने जात आहे. त्यात कुणाला काही वाटण्याची अवश्यकता आहे, असं वाटत नाही, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
कामाख्या देवीने आमची इच्छा पूर्ण केली. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं. त्यामुळे देवीकडे आणखी काही मागण्याची गरज नाही. राज्यातील बळीराजाला सुखी होऊ दे, जनतेच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊ दे, राज्यावरील अरिष्ट जाऊ दे ही प्रार्थना करणार आहे. ही प्रामाणिक भावना आहे. हाच आमचा अजेंडा आहे, असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, देवाचं दर्शन घेणं यामध्ये चुकीचं काही नाही. विरोधकांकडे काही मुद्दे शिल्लक राहिले नाहीत, त्यामुळ ते टीका करत असल्याचे मत मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. ठाकरे गटात उरलेल्या आमदार आणि खासदारांनाही लवकरच आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनासाठी घेऊन जाऊ असं वक्तव्य खासदार भावना गवळी यांनी केलं. ते आता आले असते तर त्यांना आम्ही घेऊन गेलो असतो.
या ६ आमदार खासदारांनी जाणे टाळल्याने चर्चाना उधाण-
दरम्यान शिंदे गटातील जवळपास सर्वच आमदार खासदार मंत्री हे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला रवाना झाले आहेत. पण यामध्ये काही आमदार खासदारांची अनुपस्थिती लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे या आमदारांमध्ये काही मोठे नाव देखील आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत न गेलेल्या नेत्यांमध्ये राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री शंभूराज देसाई, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. या प्रत्येकाचे न जाण्याचे कारण वेगळे सांगितले असले तरी राज्यात चर्चा मात्र जोरात सुरु आहे.