‘मातोश्री’वर कधी जाणार आहात?; जाणून घ्या काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राच्या राजकारणाने गुरुवारी नवे वळण घेतले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेविरोधात बंड केल्यानं शिवसेना पक्षप्रमुख आणि शिंदे यांच्यात तेढ निर्माण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री होणारे एकनाथ शिंदे मातोश्रीवर कधी जाणार का, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. असा सवालही शिंदे यांना विचारण्यात आला. त्याचे अडखळत उत्तर त्यांनी दिले.
गोव्यात पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अविश्वास ठरावावर भाष्य करताना शिंदे म्हणाले, “बहुमत चाचणी ही औपचारिकता राहिली आहे. भाजपचे आमदार आणि आम्ही 175 आहोत. हे ५० आमदार सत्तेपासून दूर झाले, ही ऐतिहासिक घटना आहे. कारण लोक सत्तेकडे जात असतात.”
ते म्हणाले, “आमदारांच्या एकजुटीमुळे हा विजय झाला आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा, आनंद दिघेंच्या शिकवणुकीचा हा विजय आहे. आमच्या आमदारांनी महाराष्ट्रात इतिहास घडवला आहे. 50 आमदारांचे अभिनंदन करतो आणि भाजपचे आभार मानतो.”
115 ते 120 असे बहुमत असताना त्यांनी (भाजप) माझ्यासारख्या बाळासाहेबांच्या सैनिकाला पाठिंबा दिला. त्यांनी मोदी, शहा आणि नड्डा यांचे मुख्यमंत्रीपदासाठी उदारता आणि पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानले. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून शिवसैनिकाला या पदावर विराजमान होण्यासाठी समर्थन दिलं.”
“50 आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न, अडीच वर्षात आलेल्या अनुभवांची नोंद माझ्याकडे आहे. त्यांच्या मतदारसंघात विकास निधी कमी पडणार नाही, याची जबाबदारी माझी आहे. मतदारांना अपेक्षित काम करवून देण्याची जबाबदारी माझी आहे. त्यांना गेल्या अडीच वर्षांत आलेला अनुभवाची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी मी घेईन. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,” असं त्यांनी सांगितलं.
“आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व घेऊन पुढे निघालो आहोत. धरमवीर दिघे यांनी आम्हाला शिकवण दिली आहे. जिथे अन्याय आहे तिथे काम करा, अन्यायाविरुद्ध लढा, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काम करा. बाळासाहेबांनी आम्हाला काम करायला शिकवले आहे. शिवसेनेच्या रूपात, आम्ही विधिमंडळात काम करू. राज्याच्या विकासासाठी, प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
मुलाखतीच्या अखेरीस एकनाथ शिंदे यांना मातोश्रीवर कधी जाणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शिंदे थोडं अडखळले आणि म्हणाले, “याबाबतीत जेव्हा वेळ येईल तेव्हा आपल्याला कळेल,” असं त्यांनी सांगितलं.
अधिक वाचा-
वरिष्ठांनी या कारणामुळे नाकारलं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद? अमित शाहांसोबतच्या..
फडणवीसांना मुख्यमंत्रीपदापासून दूर केल्याने भाजपमध्ये प्रचंड नाराजी, बॅनरवरून अमित शहा गायब