मध्यरात्री पेट्रोल टाकायला आलेल्या न्यायाधीशांना लावला चुना, रात्रीतच पेट्रोल पंप झाला सील

पेट्रोल पंपावर फसवणुकीच्या अनेक घटना घडत आहेत. याचा अनुभव तुम्हालाही कधी आलाच असेल. कधी कधी पेट्रोलमध्ये पाणी मिसळले जाते. काही वेळा चुकीचे आकडे दाखवून पेट्रोल कमी भरले जाते. आता अशीच एक घटना मध्य प्रदेशातील जबरालपूरमधून समोर आली आहे. या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले. याचा छडा लावण्यासाठी स्वतः न्यायाधीश या पेट्रोल पंपावर गेले आणि त्यांनी इथे पेट्रोल भरले. पण त्यांच्यासोबत जे घडलं ते बघून ते अवाक झाले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी हा पेट्रोल पंप सील केला. जाणून घेऊ नेमकं काय घडलं..
मध्य प्रदेशातील जबलपूर शहरातील एका पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसोबत पंगा घेणे चांगलेच महागात पडले. न्यायाधीशांची गाडी पेट्रोल भरण्यासाठी पंपावर थांबली होती. यावेळी कर्मचाऱ्यांनी वाहनाच्या टाकीत 57 लिटर पेट्रोल भरले. हे ऐकून न्यायाधीशांनाही आश्चर्य वाटले की 50 लिटरच्या टाकीत 57 लिटर पेट्रोल कसे बसले? मग काय, न्यायमूर्तींनी काही मिनिटांतच पेट्रोल पंप सील करून चौकशीचा सपाटा लावला.
हे संपूर्ण प्रकरण मंगळवारी रात्रीचे आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेले. त्यांनी पंपाच्या कर्मचाऱ्याला टाकी भरण्यास सांगितले. पेट्रोल भरल्यानंतर न्यायमूर्तींनी कर्मचाऱ्याला ऑनलाइन पेमेंट केले. त्यानंतर बिल घेतले तेव्हा रक्कम आणि त्यात पेट्रोलचे प्रमाण उघड झाले. मग न्यायाधीशाचे डोके हलले. त्याला आश्चर्य वाटले की ज्या कारची पेट्रोल टाकी 50 लिटर क्षमतेची आहे, त्या कारमध्ये 57.43 लिटर पेट्रोल कसे भरले? त्यांच्या गाडीत आधीच पाच-सात लिटर पेट्रोल होते. त्यांनी तातडीने प्रशासकीय अधिकाऱ्यांना या गोंधळाची व फसवणुकीची माहिती दिली. तत्काळ प्रशासन आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आणि तातडीने रात्री उशिरा पेट्रोल पंप सील करण्यात आला.
पेट्रोल पंपाचा मालक आधीच आहे बदनाम
सरबजीत सिंग मोखा यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपवर ही फसवणूक करण्यात आली होती. मोखाचे सिटी हॉस्पिटल नावाचे एक खाजगी हॉस्पिटल देखील आहे. तेथे कोरोनाच्या काळात रुग्णांना बनावट रेमडेसिव्हिरचे इंजेक्शन दिल्याचे मोठे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात सरबजितसिंग मोखा सध्या जामिनावर बाहेर आहे.
10 ते 12 लीटर पेट्रोलच्या चोरीने उच्च न्यायालयाचे न्यायाधीशच थक्क झाल्याचे बोलले जात आहे. तसेच अशा प्रकारे दररोज हजारो लोकांची लूट होत असल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा पेट्रोल पंप आहे. रात्रीच अन्न नियंत्रक कमलेश तांडेकर व पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करून पेट्रोल पंप सील करण्यात आला.
जिल्हा अन्न पुरवठा नियंत्रक कमलेश तांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपावर कमी प्रमाणात पेट्रोल दिले जात असल्याची तक्रार त्यांच्याकडे आली होती. तत्काळ मापन विभागाच्या पथकाने तपासणी केली. यामध्ये तक्रार योग्य असल्याचे आढळून आले. यानंतर पेट्रोल पंप सील करण्यात आला. पहाटे एक वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईत पंपाचे सहाही नोझल तपासण्यात आले.