भाजपाची आणखी एक मोठी खेळी; आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला दिली ‘हि’ मोठी जबाबदारी

राज्यात मागील १० दिवसात घडलेल्या अभूतपूर्व घडामोडीनंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. पक्षाच्या आदेशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या दहा दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 39 आमदारांनी महाविकास आघाडीची साथ सोडल्याने सरकार गडगडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. मात्र, नंतर भाजपने शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत सर्वाना जोरदार धक्का दिला.
त्यानंतर भाजपने पुन्हा एक मोठी खेळी केली आहे. येत्या ३ आणि ४ जुलै रोजी २ दिवसीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात शिंदे सरकारला बहुमत चाचणी द्यावी लागणार आहे. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदाची निवड केली जाईल.
या विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव चर्चेत होते. पण आज तरुण चेहरा राहुल नार्वेकर यांना पुढे करण्यात आले आहे. नार्वेकर यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज केला आहे. एकीकडे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळत आहे तर दुसरीकडे एकेकाळी शिवसेनेत असलेले नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपद मिळणार आहे.
कोण आहेत राहुल नार्वेकर?
राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत. शिवाय, ते मूळचे शिवसैनिक असून ते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
राष्ट्रवादीकडून राहुल नार्वेकर यांनी मावळ लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर 2016 मध्ये त्यांची विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर नार्वेकरांनी कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली.
राहुल नार्वेकर यांचे वडील सुरेश नार्वेकर कुलाबा भागाचे नगरसेवक होते, तर अलीकडेच त्यांचे भाऊ मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक चारमध्ये नगरसेवक होते. वहिनी हर्षिता नार्वेकर याही प्रभाग क्रमांक २२६ मधून नगरसेवक होत्या.
2019 च्या निकालानंतर राज्यात एक ऐतिहासिक घटना घडली. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने महाविकास आघाडी स्थापन केली. यामध्ये विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळाले. मात्र दीड वर्षानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हे पद रिक्त आहे.