बातम्या

फडणवीसांना मुख्यमंत्रीपदापासून दूर केल्याने भाजपमध्ये प्रचंड नाराजी, बॅनरवरून अमित शहा गायब

गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर ठाकरे सरकार सत्तेवरून पायउतार झाले आणि शिंदे सरकार सत्तेवर आले. मात्र, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, अशी भाजप कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, शिवसेनेत बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केलेल्या एकनाथ शिंदे यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी फडणवीस यांच्या जागी मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवारी दिली.

यामुळे राज्यभरातील भाजप समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. यासोबतच पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयाचाही उघड विरोध होत आहे. आता फडणवीस राहत असलेल्या नागपुरात भाजपचे कार्यकर्तेही नाराजी व्यक्त करत आहेत. यासोबतच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बॅनरवरून अमित शहा यांचे फोटो गायब करून फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.

ठाकरे सरकार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील हे जवळपास निश्चित होतं. मात्र, फडणवीस यांनी काल सायंकाळी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची घोषणा केल्याने कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे या सर्व घटनांमध्ये अमित शहा यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. नागपुरात लागलेल्या बॅनरमध्ये नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील यांचे फोटो आहेत मात्र भाजपचे बलाढ्य नेते अमित शहा यांचे फोटो नाहीत.

शिंदे मुख्यमंत्री होण्यापूर्वी लागलेले बॅनर

नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी हे बॅनर लावले आहेत. त्यात म्हटले आहे की, प्रिय देवेंद्र, तुझ्या त्यागाचे मोल मौल्यवान आहे. आपल्या गळ्यातील माळ एका क्षणात दुसऱ्याच्या गळ्यात घातली. आधी पक्ष नंतर मी हे, मूल्य तू खरे करून दाखवलेस, तुला मानाचा मुजरा.

नंतर लागलेले बॅनर

दरम्यान भाजपच्या आजपर्यंतच्या सर्व बॅनरमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यानंतर अमित शहा यांचा फोटो आजपर्यंत लावला जायचा. पण अमित शहांनी फडणवीस यांचा पत्ता कट केला या चर्चेमुळे अमित शहा हे बॅनरवरून गायब झाले आहेत. मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात आज भाजपने केलेल्या जल्लोषात देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील आणि इतर प्रमुख भाजप नेते उपस्थित नव्हते. भाजपच्या गोटात खूपच नाराजी असल्याची चर्चा यामुळे सुरु आहे.

अधिक वाचा-

शिवसेना संकटात असताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे ते १६ आमदार कोण? जाणून घ्या नावे

एकनाथ शिंदेंचे बंड ED मुळे आहे अशी चर्चा ज्या सचिन जोशींमुळे झाली ते नेमके आहेत कोण?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button