नारायण राणे हे सध्या भाजपमध्ये असून ते राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास खूप संघर्षमय राहिला आहे. शिवसेनेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेल्या राणे यांनी पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते आता भाजपमध्ये सक्रिय आहेत.
नारायण राणे हे एकेकाळी शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते म्हणून प्रसिद्ध होते. एक शाखाप्रमुख म्हणून सुरु झालेला शिवसेनेतील त्यांचा प्रवास नगरसेवक, तीन वर्षे बेस्ट समितीचे अध्यक्षपद, मंत्रीपद आणि नंतर थेट मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत मर्जीतील नेते म्हणून नारायण राणे ओळखले जायचे.
नारायण राणे यांचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली. १९९५ साली राज्यात युतीची सत्ता आली तेव्हा शिवसेनेत उघडउघड दोन गट होते. एकीकडे उद्धव ठाकरे, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई होते. तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे, नारायण राणे आणि स्मिता ठाकरे होते.
१९९९ साली बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींना हटवून नारायण राणेंना मुख्यमंत्रिपदी नेमण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर उद्धव ठाकरे खुश नव्हते. उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात पहिली ठिणगी तेव्हाच पडली. त्यांनतर ५ वर्षात अनेक घडामोडी घडल्या आणि २००५ मध्ये राणेंनी शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर स्वाभिमानी पक्ष आणि नंतर भाजप असा नारायण राणेंचा प्रवास झाला आहे.
नारायण राणेंना हऱ्या-नाऱ्या नाव कसं पडलं?
नारायण राणे यांनी आपले आत्मचरित्र झंजावात मध्ये याबद्दल माहिती दिली आहे. १९६६ मध्ये जेव्हा शिवसेना हा पक्ष उदयास आला. चेंबूरमध्ये त्यावेळी जेमतेमच लोक मराठी होते. बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या हक्कासाठी स्थापन केलेल्या पक्षामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. शिवसेना कमी काळातच लोकांना आपली वाटायला लागली.
नारायण राणे हे त्यावेळी १४ वर्षाचे होते. पुढे १६ व्या वर्षी त्यांनी १९६८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. नारायण राणेंनी खिशातील २ रुपये देऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी नारायण राणेंचा एक मित्र होता ज्याचं नाव होत हनुमंत परब. दोघे खूपच जिवलग होते. त्यामुळे कुठेही गेले तर ते एकत्रच असायचे. हनुमंत परब यांनी देखील राणेंसोबत शिवसेनेत प्रवेश केला.
दोघेही बाळासाहेबांचे कट्टर समर्थक झाले. बाळासाहेबांची कुठेही सभा असली तर ते जायला लागले. त्या सभेला जाण्यासाठी ते कुठून तरी पैशाची जमवाजमव करून ठेवत. बाळासाहेबांच्या एंट्रीला दोघे हार घेऊन हजर असायचे. बाळासाहेबांना कधी कोणी काही बोललं तर ते प्रकरण मा रामा रीपर्यंत गेले तरी ते मागेपुढे बघायचे नाहीत.
या दोघांची जोडी त्यामुळे लवकरच सर्वांच्या नजरेत यायला लागली आणि खुप लोकप्रिय झाली. या दोघांना यामुळेच लोक हऱ्या नाऱ्या म्हणायला लागले. पुढे या जोडीच्या नावावरून हऱ्या-नाऱ्या जिंदाबाद हा चित्रपट देखील आला होता.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.