वैवाहिक आयुष्यातील सर्वात आनंददायी क्षण म्हणजे मुलांचे पालक होणे. भारताची वाढणारी लोकसंख्या पाहता सरकारने लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी याबाबत भरपूर जनजागृती केली आहे. सध्या भारतात ‘हम दो हमारे दो’ असा काहीसा ट्रेंड सुरु आहे.
काही जोडपी त्यांचे संपूर्ण आयुष्य फक्त एका मुलासह घालवतात, तर काही जोडप्यांना दोन मुले व्हावीत अशी इच्छा असते. अशा परिस्थितीत एक प्रमुख असा प्रश्न उद्भवतो की, पहिल्या मुलाच्या जन्मानंतर, दुसरे मूल ठेवणे किती योग्य असेल जेणेकरून कुटुंबाचे संगोपन योग्य प्रकारे होईल. याबाबत विशिष्ट विचार करून निर्णय घेतला जातो.
एका अभ्यासानुसार असे सांगितले आहे की जर तुम्ही पहिल्या मुलानंतर दुसरे मूल होण्याचा विचार करत असाल, तर किमान तुम्ही दीड ते दोन वर्षांचे अंतर ठेवले पाहिजे. जर दीड ते दोन वर्षांचे अंतर न ठेवता तुम्ही याआधीच दुसऱ्या बाळाचा विचार करायला सुरुवात केली, तर त्यामुळे तुमच्या नवजात बाळाचे वजन कमी होऊ शकते. बाळाचा अकाली जन्म देखील होण्याची शक्यता असते. याशिवाय पहिल्या मुलावरही त्याचा परिणाम होतो.
वास्तविक पाहता एकाच वेळी दोन मुलांचे संगोपन करणे कठीण जाण्याची शक्यता असते. याचा मुलांवर तसेच पालकांवर एकत्रितपणे वाईट परिणाम होत नाही मात्र त्यांच्यावर अधिक जबाबदारी वाढते, ज्यामुळे ते तणावाखाली राहण्याची परिस्थिती निर्माण होते.
जर तुम्ही १ वर्षापेक्षा कमी कालावधीत दुसऱ्या मुलाची योजना आखत असाल तर आईला प्रसूतीच्या बाबतीत धोका वाढू शकतो. प्रसूती दरम्यान आईच्या जीवाला देखील धोका वाढू शकतो. जर पहिल्या डिलीव्हरीमध्ये वापरलेले टाके चांगले कोरडे झाले नाहीत, तर दुसऱ्या डिलीव्हरीमध्ये टाके उघडण्याची शक्यता आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, पहिल्या मुलाच्या जन्मानंतर, पालकांनी दुसऱ्या मुलाला जन्म देण्यासाठी किमान १८ किंवा २३ महिने थांबावे. असे केल्याने, आईचे आणि पहिल्या मुलाचे तसेच दुसऱ्या मुलाचे आरोग्य चांगले राहील आणि तिघांनाही कोणत्याही प्रकारच्या धोक्याचा सामना करावा लागणार नाही.