
भारतीय जनता पार्टीचे आमदार व सातारा जिल्हा भाजपाचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या गाडीला काल रात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आमदार गोरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुणे पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमीजवळ शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला.
नेमका अपघात कशामुळे झाला?
काल गोरे नागपूरवरुन पुण्यात आले होते. पुण्यावरुन त्यांच्या गावी जाताना फलटणजवळ गाडी पुलावरुन कोसळली. समोरचं वाहन जवळ आल्यामुळे कदाचित ते झालं अशी प्राथमिक माहिती आहे. पण गोरेंचे वडील मात्र त्यावेळी रस्त्यावर एकही वाहन नसल्याचे म्हणाले. तसेच अपघात झाला तेव्हा गाडीमध्ये गोरेंबरोबर चालक, दोन सुरक्षारक्षक, एक खासगी सचिव होते. यापैकी चालक आणि खासगी सचिवांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
खासदारांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव-
गोरे यांनी अपघातानंतर फोन करुन सर्वात प्रथम खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना माहिती दिली. खा. निंबाळकरांना जयकुमार गोरे यांचा ३ वाजून पाच मिनिटांनी फोन आला की गाडीचा अपघात झालेला आहे. लोकेशन सांगता येणं शक्य नाही पण फलटणच्या आसपास आहे असं, खूप लागलं आहे असं त्यांनी सांगितलं. खा.निंबाळकर यांना नेमकं ठिकाण तर माहिती नव्हतं. पण ते फलटणपासून निघाले आणि ५-६ मिनिटातच आमदार गोरे यांची गाडी शोधली. निंबाळकर घटनास्थळी गेले तेव्हा गाडी ७०-८० फूट खाली पडल्याचं दिसलं. त्यांनी तात्काळ पोलीस यंत्रणेच्या मदतीने गाडी बाहेर काढली आणि गोरेंना आणि सहकाऱ्यांना रुग्णालयात नेण्याची सोय केली.
खासदार निंबाळकर म्हणाले “ती गाडी वरुन आपटल्याने गाडीतील सीट वगैरे तुटले होते. गोरेसाहेब बसतात त्याच बाजूने गाडी आपटली. चालक आणि पीएला गंभीर दुखापत होती. गोरे स्वत: बाहेर आले होते. पुढल्या पाच ते सहा मिनिटांमध्ये रुग्णवाहिका आल्या. त्यांना सर्वांना रुग्णालयात हलवण्यात आलं,” त्याचप्रमाणे, “गोरेंनी आधी अंगरक्षक, पीए आणि चालकाला रुग्णवाहिकेतून पुढे पाठवून दिलं आणि स्वत: शेवटच्या रुग्णवाहिकेतून गेले. त्यांच्या तीन बरगड्यांना दुखापत झाली आहे. ते लवकरच बरे होतील. ते व्यवस्थितपणे बोलत आहेत. त्यांना कुठलीही अडचण वाटत नाही,” असंही ते म्हणाले.
खासदार निंबाळकरांनी स्वतः गोरे यांच्या समवेत पुण्याला येऊन त्यांना रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि त्यांच्यावर योग्य उपचाराची काळजी घेतली.
वडिलांना शंका-
मी जयकुमारांशी बोललो आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. मात्र एक शंका मनात उत्पन्न होतेय. रस्त्यावर कुठलीच वाहतूक नसताना गाडीला अपघात कसा घडतो असा प्रश्न पडलाय. ते देखील आमच्या गावात म्हणजे फलटण मध्येच हा अपघात घडतो यामुळे आणखीनच शंका येते. तिथे अपघात होण्यासारखे काही नाही. मला शंका वाटतेय. मला वाटतं ते बोललो. हे फलटणमध्येच घडतंय गावात. म्हणून मला शंका वाटतेय मी कोणावर संशय घेऊ शकत नाही, असं जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे म्हणाले.
डुलकीमुळे अपघात?
अपघातानंतर जयकुमार यांचा कार चालक कॉन्शियस होता, त्याला झोप लागल्याच्या पलिकडे काही निदर्शनास आलं नाही. ड्रायव्हर शुद्धीवर आल्यावर त्याचे स्टेटमेंट देईल, पण आज तरी मी खात्रीशीर सांगू शकतो की पहाटेच्या डुलकीमुळे हा अपघात झालाय, असं खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले. जयकुमार गोरे यांची प्रकृती उत्तम असल्याची माहितीही त्यांनी दिली.