सावत्र आई आणि वडिलांच्या जाचाला कंटाळून दोन्ही बहिणींनी घर सोडले. दोघीही अल्पवयीन होत्या. गुरुवारी रात्री त्या कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गोंधळलेल्या अवस्थेत फिरत होत्या. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांना गाठले.
त्या दोघी बहिणी या वेश्यांच्या तावडीत सापडल्याचं होत्या. पण चौकातील रिक्षाचालक देवासारखे धावून आले आणि त्या बहिणी वाचल्या. या रिक्षा चालकांनी पाहिलं कि महिला त्या मुलींना जबरदस्तीने घेऊन जात आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन त्या अल्पवयीन मुलींची वेश्यांच्या तावडीतून सुटका करत पोलिसांच्या स्वाधीन केले. अशा प्रकारे कोल्हापूरच्या रिक्षाचालकांच्या माध्यमातून माणुसकी पुन्हा एकदा समोर आली आहे. ते धावून नसते आले तर या दोन मुली वेश्या व्यवसायात ढकलल्या गेल्या असत्या.
पालकांच्या छळाला कंटाळून दोन्ही अल्पवयीन मुलींनी घर सोडून इचलकरंजी येथून एसटीने पळ काढला. बसने कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकावर पोहोचल्या. रात्रीची वेळ असल्याने त्या गोंधळल्या. त्या स्टँडवर रिक्षात बसल्या. रिक्षाचालकांनी त्यांना अनेक ठिकाणी नेले. मात्र, त्यांना कुठे जायचे हे समजत नसल्याने ऑटोरिक्षाचालकाने त्यांना परत आणून मध्यवर्ती बसस्थानक चौकात सोडले. ऑटोरिक्षा चालकाने त्यांची सखोल चौकशी केली असता त्या घरातून पळून आल्याचे सांगितले.
यानंतर मुली पारीख पुलाकडे जात होत्या. त्या परिसरातील वेश्यांनी त्यांना पाहिले होते. त्यांना आपल्याजवळ बोलावून दाभोलकर चौकाकडे नेले. संबंधित महिला मुलींना वेश्याव्यवसायात नेतील या भीतीने रिक्षाचालकांनी स्टँडवर हा प्रकार पाहिला आणि त्यांची सुटका करून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी संबंधित मुलींना बालसुधारगृहात पाठवले आहे.
रिक्षाचालकांचे होतेय कौतुक
शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांनी मध्यवर्ती बसस्थानक चौकातील रिक्षा स्टॉपवर भागवत घोडके, चंद्रकांत भोसले, अमोल देवकुळे, निखिल पोवार, सादिक मुलाणी, मेहबूब ताशवाले या रिक्षाचालकांचे रात्रीच्या वेळी अल्पवयीन मुलींना वेश्यांच्या तावडीतून मुक्त केल्याबद्दल कौतुक केले आहे.