प्रेरणादायी

कॉलेजमध्ये नेत्याच्या मुलाने खूप त्रास देऊनही ती मागे हटली नाही, बनली क्लास १ अधिकारी !

एक नकोशी म्हणून जन्मलेली मुलगी. जिच्या जन्मानंतर बाप तिचं साधं तोंड बघायला पण आला नाही. तिला शाळेत घालायचा प्रश्नच नव्हता. नेहमीच नकोशी सारखी वागणूक. पण तिने संघर्ष करून आपल्या जिद्दीच्या बळावर यश मिळवलं कि ते यश हे खूप आगळंवेगळं असतं. असच काहीसं यश मिळवलं आहे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डु या छोट्याशा गावच्या या तरुणीने. जाणून घेऊया एक नकोशी ते क्लास वन अधिकारी असा तिचा प्रवास..

सोलापूर जिल्ह्यातील कुर्डु या गावात जन्मलेली सोनाली मनोहर भाजीभाकरे आज नायब तहसीलदार म्हणून काम करत आहे. सोनाली जुन्या विचारसरणी असलेल्या गावात जन्माला आली. या गावात मुली नकोशी असायचा. त्यांना शिक्षण देणे हि खूप दूरची गोष्ट असायची. सोनाली जन्मल्यापासून तिच्या वाट्याला दुःख आलं. तिचे वडील ती जन्मल्यावर बघायला देखील नाही आले. तिला शाळेत घालायला त्यांचा विरोध होता. आईने मात्र शिक्षणासाठी पुढाकार घेतला.

चौथी पाचवीत असतानाच तिला लग्नाबद्दल बोललं जायचं. सर्व गोष्टी तिला करायला लावल्या जायच्या. धुनी भांडी स्वयंपाक शिकवलं गेला तो लग्न लवकर करायचं म्हणून. अन झालंही तसेच खेळण्या बागडण्याच्या वयात ती सातवीत असतानाच तिच्या लग्नासाठी पहिलं स्थळ आणलं गेलं. तेव्हा तिला लग्न संसार काय हे कळतही नव्हते. जबरदस्तीने साडी घालून तिला त्या मुलापुढे नेलं तेव्हा तिला वाटलं कि आता संपलं आपलं आयुष्य. काही कारणाने ते लग्न जमलं नाही अन सोनालीचा शिक्षणाचा मार्ग खुला राहिला.

पण ती अशा वातावरणात होती जिथं कुठल्या मुलीला बोलायचं कुठलीला बोलायचं नाही हे देखील घरून सांगितलं जायचं. शाळेत सोनाली खूप हुशार होती. शिक्षण तिला नेहमी मदत करत असत. तिच्या आयुष्याला ध्येय मिळाले एका प्रातांधिकारी म्हणून आलेल्या महिलेमुळे. सोनालीने त्या मॅडमकडे बघून स्वतःही असंच मोठं अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहिलं. या स्वप्नासाठी ती पुढे जगायला लागली. कुर्डू आणि कुर्डुवाडी या शहराची मिळून एक शाळा होती. त्यात सोनाली दहावीला प्रथम आली. तेव्हा तिच्या शिक्षणाला बळ मिळालं. गावच्या सरपंचानी तिच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.

सोनालीला इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हायचं होतं. पण तिला घरून CET चा फॉर्म भरायला पैसे देखील मिळाले नाही. कारण घरच्यांना वाटलं पुन्हा ती बाहेर कुठं शिकायला जाईल. १२ वि झाल्यावर नातेवाईकांच्या सांगण्यावरून तिला डीएडला पाठवण्यात आलं. तिला आवड नसतानाही डीएडला जावं लागणार होतं. पण त्यातही तिच्या वडिलांना गावाजवळच बार्शीच्या कॉलेजला प्रवेश हवा होता जो मिळाला नाही. तिचं डीएड देखील हुकलं. पण कुर्डुवाडीत एक नवीन कॉलेज सुरु झालं तिथं तिला बीएस्सीला प्रवेश मिळाला.

तिने प्लॅन बी म्हणून सोलापूरला एमबीएला एडमिशन घेतलं. ती घरून सोलापूरला रोज ८६ किलोमीटर येणे जाणे करायची. एमबीएला असताना तिला अनेक अडचणी आल्या त्रास झाला. तिला एका लोकल नेत्याच्या मुलाने खूप त्रास दिला. तो तिच्यामागे कॉलेजच्या गेटपर्यंत यायचा. ती घरीही या गोष्टी सांगू शकत नव्हती. मित्रांच्या मदतीने तिने या संकटावर मात केली. ती त्या त्रासाला घाबरली नाही. त्यावर मात करून पुढे गेली.

एमबीए झाल्यावर तिने जॉब केला. थोडं आर्थिक स्थैर्य आल्यानंतर तिने पूर्ण वेळ अभ्यास करायचं ठरवलं. ती प्रत्येक वेळी पूर्व परीक्षा पास होत गेली. तर ६ वेळा मुख्य परीक्षा दिल्यानंतर तिने ३ वेळा मुलाखत देखील दिली. पण तिला अपयश येत होतं. लोक निगेटिव्ह बोलायला लागले. तिला अपमान सहन करावा लागू लागला. अजून किती दिवस शिकणार म्हणून टोमणे ऐकावे लागले. नातेवाईक घरी येऊन सांगायचे कि मुलगी पुण्यात फक्त मजा करायला राहतेय. परीक्षांची तयारी ती करतच नाही.

पण कुटुंबाला मात्र खरं काय माहिती होतं. ते तिला साथ देत होते. नातेवाईकांनी घरच्यांना सल्ले दिले कि तिला तुम्ही घरातून काढून देऊ सांगा, तिच्यासोबत नातं तोडू. खूप दबाव टाकला गेला. कारण होतं लग्न करावं. कोणत्याही प्रकारचे स्थळ आणले गेले. एका कुठलेही कामधंदा नसणाऱ्या मुलासोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकला गेला. २०२० मध्ये सोनालीने तिसरी मुलाखत दिली. निकालाची वाट ती बघत होती. एक मैत्रीण मस्करी मध्ये म्हणाली तुझी निवड नाही झाली तर माझ्याकडे कामवाली बनून ये. ती मैत्रीण मस्करीत म्हणूनही सोनालीच्या मनाला ते लागलं होतं.

लॉकडाऊन मध्ये १९ जून २०२० रोजी MPSC चा निकाल लागला. सोनाली अधिकारी झाली होती. जे लोक नाव ठेवत होते ते सत्काराला यायला लागले. ते नाव ठेवणारे लोक जेव्हा यायचे तेव्हा सोनाली त्यांना हसून बोलायची खरी पण ती रात्री ढसाढसा रडायची. सोनालीला ज्या आई वडिलांनी भावाने अधिकारी होईपर्यंत साथ दिली ते मात्र तिचं हे यश जास्त दिवस बघू शकले नाही.

तिच्या वडिलांचे हार्ट अटॅकने तर मोठ्या भावाचे अन आईचे कोरोनाने निधन झाले. ज्या आई वडिलांसाठी सोनालीने स्वप्न बघितलं तेच या जगात न राहिल्याने तिला याची खूप खंत वाटते. कुटुंबासाठी खूप काही करायचं होतं. पण ती ते करू शकत नाही. सोनालीच्या या संघर्षाला मानाचा मुजरा. तिच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button