एकनाथ शिंदेंचे बंड ED मुळे आहे अशी चर्चा ज्या सचिन जोशींमुळे झाली ते नेमके आहेत कोण?

सध्या देशात सर्वात जास्त काही चर्चेत असेल तर ते म्हणजे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं बंड. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या विद्यमान मंत्र्यांसह जवळपास ५० आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे ईडीच असल्याची शंका अनेकांना आहे. एकनाथ शिंदे यांच्या एका अतिशय जवळच्या व्यक्तीला ईडीची नोटीस आल्यानंतरच त्यांनी हे बंड केलं असं बोललं जात होतं.
तशा आशयाचं एक कात्रण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. हे कात्रण एका वर्तमानपत्राचं आहे. व्हायरल झालेल्या कात्रणामुळे चर्चांना उधाण आलं आहे कि खरच हे बंड ईडीमुळे झालं आहे का. ईडीची नोटीस असलेल्या व्यक्तीचं नाव सचिन जोशी आहे. सचिन जोशी एकनाथ शिंदेंचे आर्थिक व्यवहार सांभाळतात, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिंदेंच्या बंडानंतर सचिन जोशी कुठे आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे. जाणून घेऊया कोण आहेत हे सचिन जोशी आणि ते सध्या कुठे आहेत.
कोण आहेत सचिन जोशी?
सचिन जोशी हे मूळचे ठाण्यातीलच असून त्यांचं नाव राज्यात चर्चेत आहे. ठाण्याच्या बांदोडकर महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं आहे. शिंदेंचे आर्थिक व्यवहार सचिन जोशी हाताळत होते, असं सांगितलं जातं. मात्र अधिकृतपणे कोणीही त्याची वाच्यता केलेली नाही. दहा दिवसांपूर्वी सचिन जोशींना ईडीची नोटीस आल्याचं वृत्त आहे. तेव्हापासून जोशी नॉट रिचेबल असल्याची चर्चा होती. त्यामुळे शिंदेंच्या बंडांनंतर सचिन जोशी नेमके आहेत कुठे, हा प्रश्न विचारला जात आहे.
सचिन जोशी आणि ठाण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाकडून शिंदेंचे आर्थिक व्यवहार सांभाळले जातात, असं बोललं जातं. तसेच एका चॅनेलने दावा केला आहे कि एकनाथ शिंदेंच्या आर्थिक व्यवहारांचे सेक्रेटरी म्हणून सचिन जोशी यांच्याकडे जबाबदारी होती.
कुठे आहेत सचिन जोशी?
सचिन जोशी हे धर्मवीर प्रदर्शित झाल्यानंतर ‘नॉट रिचेबल’ असल्याची बातमी मराठी वृत्तपत्राने दिलीये. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडापूर्वी सचिन जोशी हे किमान ठाण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते, असे सूत्रांनी सांगितले. धर्मवीर चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाई यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, सचिन जोशी हे सध्या आसाममध्ये एकनाथ शिंदेंसोबत आहे. ते भूमिगत झालेले नाही. सचिन जोशी यांना ईडीची नोटीसही आलेली नाही असंही ते म्हणाले.
दरम्यान शिंदे आणि त्यांचा समर्थक गट वारंवार हिंदुत्त्वाचा उच्चार करत आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाचा विचार घेऊन आपण वाटचाल करत असल्याचा त्यांचा दावा आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचा निशाणा भाजपवर आहे. ईडीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सेना संपवण्याचा कट भाजपनं आखल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
हे देखील वाचा-
एकनाथ शिंदे यांचा संशयास्पद वाटणारा हा व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल, बघा व्हिडीओ
केव्हा दूर होणार महाराष्ट्र सरकारवरील संकट? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले..