Breaking News
Home / बातम्या / ‘आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कारटं’, राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्र पोलिसांची बदनामी

‘आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कारटं’, राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्र पोलिसांची बदनामी

१९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट , २००८ मुंबई हल्ला, जवेरी बाझार स्फोट, जर्मन बेकरी स्फोट अशा अनेक प्रकरणाचा मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी कसोशीने तपास करत आरोपींना फासावर चढवले. तपास आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात कार्यतत्पर असलेल्या महाराष्ट्र पोलिसांवर आताच एका पक्षाला एवढा अविश्वास का वाटत असावा.

पालघर येथील दोन साधूंच्या हत्येचा तपास नीट होत नाही, सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होत नाही, रिया चक्रवर्तीला अभय दिले जात आहे. बॉलीवूडमधील अंमली पदार्थ रॅकेटला हात लावला जात नाही. वाझे प्रकरणात तपास योग्य पद्धतीने होत नाही असे एकट्या भाजपलाच का वाटत असते. प्रत्येक महत्त्वाच्या प्रकरणात भाजप महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर अविश्वास का दाखवत आहे. एखाद्या प्रकरणात पोलिस दलावर अविश्वास दाखवणे, आरोप करणे आपण समजू शकतो पण सरसकट प्रत्येक प्रकरणात पोलिस कार्यक्षम नाही म्हणून त्यांच्यावर टीका करत राहणे कितपत योग्य ?

सुशांतसिंग राजपूत प्रकरण तीन महिने चर्चेत राहिले, सीबीआयकडे तपास दिला त्यांनी आपल्या पद्धतीने तपास करून पाहिला, मुंबई पोलिसांची मीडिया ट्रायल झाली, यथेच्छ बदनामी करून झाली पण शेवटी त्यातून बाहेर काय आले. सुशांतसिंग याने आत्महत्या केल्याचे सीबीआयने देखील मान्य केले. जी गोष्ट मुंबई पोलिस पहिल्या दिवसापासून सांगत होते तेच सत्य होते. पण विरोधीपक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते विश्वास ठेवायला तयार नव्हते. याच प्रकरणात जेव्हा अर्णब गोस्वामी मुंबई पोलिसांची दररोज बदनामी करत होता तेव्हा भाजपचा एकही नेता किंवा प्रमुख कार्यकर्ता आपल्या पोलिसांच्या, परमबीर सिंग यांच्या समर्थनाथ उभा राहिला नाही. का त्यांना आपल्या पोलिस दलावर विश्वास नाही. आज ज्या पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांना खांद्यावर घेवून भाजप नाचत आहे त्या परमबीर सिंग यांच्यावर हा अर्णब गोस्वामी एकेरी भाषेत टीका करत त्यांना खुले आव्हान देत होता. तेव्हा भाजपवाले कोठे गेले होते. ?

आज मुंबई, महाराष्ट्र पोलिस करत असलेल्या प्रत्येक तपासात भाजपला शंका वाटते, तशी शंका भाजपला भीमा कोरेगाव प्रकरण, पानसरे हत्या, दाभोळकर हत्या, अर्बन नक्षल प्रकरणावेळी का वाटली नाही. की ‘आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कारटं’ असे भाजपचे धोरण आहे. या महत्त्वाच्या प्रकरणात तत्कालिन गृहमंत्री फडणवीस यांनी काय भूमिका घेतली होती. त्यावेळच्या विरोधी पक्षाने भाजपवर जरूर आरोप प्रत्यारोप केले होते पण पोलिसांची प्रतिमा कधी मलीन केली नव्हती.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची होमगार्ड महासंचालकपदी बदली केली म्हणून आरडाओरड करणारे, न्यायालयात धाव घेणारे, माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्या तडकाफडकी बदलीबाबत मात्र काहीही बोलत नाहीत. मुंबईतील बहुचर्चित तपासांचा छडा लावणाऱ्या माजी पोलिस अधिकारी राकेश मारिया यांच्या बाबत देवेंद्र फडणवीस कसे वागले हे सगळ्या मराठी जनतेला माहीत आहे. आज मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे ऐकले नाही असा आरोप करणारे राकेश मारिया शीना बोरा प्रकरणी माजी पोलिस आयुक्त जावेद अहमद यांच्याविषयी तक्रार करत होते, तेव्हा फडणवीस यांनी त्यांचे किती ऐकले होते.

केंद्रातील सीबीआय, ईडी, आयकर विभाग सारख्या राष्ट्रीय तपास यंत्रणांचा आपल्या राजकीय विरोधकांना गप्प करण्यासाठी भाजप कशाप्रकार वापर करत आहे, हे उघड सत्य आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे देवून भाजप महाराष्ट्र पोलिसांचे खच्चीकरण करत आहे. देशातील इतर राज्यातील अनेक तपासात तेथील नेते सीबीआय चौकशीची मागणी करत असतात. पण ती हातात न घेता महाराष्ट्रातील साध्या आत्महत्येच्या प्रकरणात देखील केंद्रातील यंत्रणांना रस असतो. असे का याचे उत्तर रस्त्यावरील साधा व्यक्तीसुद्धा देईल. महाराष्ट्र पोलिसांची आपल्या राजकीय फायद्यासाठी कोण बदनामी करत आहे हे मराठी जनतेला नक्की चांगल्याप्रकारे माहीत आहे, त्यामुळे भाजपने राजकीय पक्षांवर जरूर आरोप प्रत्यारोप करावे पण मुंबई, महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करू नये एवढीच अपेक्षा.
-रितेश रमेश देशमुख

(टीप- लेखामधील मतं लेखकाची वयक्तिक मतं आहेत. या लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.)

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *