असं एक रेल्वे स्टेशन जे अर्ध गुजरात मध्ये तर अर्ध महाराष्ट्रामध्ये आहे, एक वाद आणि स्टेशनचे तुकडे

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेचे मागणी पुढे आली. त्यातूनच द्विभाषिक राज्याची स्थापना झाली. परंतु नंतर विदर्भ व मराठवाड्यासह महाराष्ट्र, सौराष्ट्रसह गुजरात आणि मुंबई हा केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न होत आहे म्हणत संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु झाली. या चळवळीत जवळपास १०८ लोक हुतात्मा झाले. शेवटी १ मे १९६० रोजी मुंबईसह मराठी भाषिकांचे महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांचे गुजरात अशी दोन वेगवेगळी राज्ये स्थापन झाली.
महाराष्ट्र आणि गुजरातची वाटणी होताना गुजराती भांडवलदारांनी आम्ही मुंबईचा विकास व उभारणी केली असा दावा केला. त्याचेच व्याज म्हणून राज्यस्थापनेनंतर महाराष्ट्राने गुजरातला त्यांच्या नव्या राजधानीच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपये दिले. सोबतच डांग, उंबरगाव, धरमपूर, वासदा हे मराठी भाषिक प्रदेश वाटणीत गुजरातला गेले. महाराष्ट्र आणि गुजरातची ही वाटणी हळूहळू नवापूर रेल्वे स्टेशनपर्यंत आली. मुळात हे रेल्वेस्टेशन बांधले होते तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्येच स्थापन झाली नव्हती.
नवापूर हा महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील तालुका आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या वाटणीच्या वेळी दोन्ही राज्यांनी नवापूर रेल्वे स्टेशनवर आपापला दावा केला. परंतु केंद्र सरकारने हे रेल्वे स्टेशन दोन्ही राज्यांमध्ये निम्मे निम्मे वाटून दिले.
आज हे रेल्वे स्टेशन निम्मे महाराष्ट्रात आहे तर निम्मे गुजरातमध्ये आहे. रेल्वेस्टेशनवरच्या बाकड्यावर बसणाऱ्यांना लक्ष द्यावे लागते की आपण कुठल्या राज्यात बसलोय. खास बाब म्हणजे या रेल्वे स्टेशनवर तिकीटाची खिडकी महाराष्ट्रात आहे तर स्टेशनमास्तरचे कार्यालय गुजरातमध्ये आहे.
नवापूर रेल्वे स्टेशनवर हिंदी आणि इंग्रजीसोबतच मराठी आणि गुजराती भाषांमधील अनाउन्समेंट आणि सूचना दिल्या जातात, जेणेकरुन दोन्ही राज्यातील प्रवाशांना समजण्यास सोपे जावे. रेल्वे पोलीस स्टेशन आणि केटरिंग महाराष्ट्रात आहे, तर वेटिंग रुम, पिण्याचे पाणी आणि शौचालय गुजरातमध्ये आहे. ट्रेन महाराष्ट्रातून आली असेल तर त्याचे इंजिन गुजरातमध्ये उभे असते आणि ट्रेन गुजरातमधून आली असेल तर त्याचे इंजिन महाराष्ट्रात उभे असते.
या रेल्वेस्टेशनवर अर्धा कायदा महाराष्ट्राचा तर अर्धा गुजरातचा चालतो. महाराष्ट्रात गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी असल्याने गुजरातच्या बाजूला विक्री करतो, तर गुजरातमध्ये दारुविक्रीवर बंदी असल्याने तिकडचे लोक अलीकडे येऊन खरेदी करतात.