अमेरिकेत शिक्षण ते झेडपीचा सदस्य, नेहमीच चर्चेत राहणाऱ्या सत्यजित तांबे यांचा जीवनप्रवास

युवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मोठ्या घडामोडीनंतर ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरले. नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराचा घोळ होण्याच्या बरोब्बर एक महिन्यापूर्वीचं देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते “बाळासाहेब थोरात, माझी एक तक्रार आहे की, अशा प्रकारचे (सत्यजित तांबे) नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? आणि जास्त दिवस बाहेर ठेवू नका. आमचाही डोळा मग त्यांच्यावर जातो.”
देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा जणूकाही संकेतच दिले होते आगामी अनपेक्षित अन् धक्कादायक घडामोडींचे. फडणवीसांच्या या वक्तव्याला काँग्रेसनं बहुधा गंमतीनं घेतलं, पण सध्याच्या घडामोडी पाहता, ते किती सूचक होतं, हे कळून यावं. आज जाणून घेऊया सत्यजित तांबे यांचा जीवनप्रवास..
अमेरिकेत शिक्षण ते झेडपीचा सदस्य
महाराष्ट्रातल्या तरुण राजकारण्यांमध्ये सत्यजित तांबेंची गणती होते. येत्या 27 सप्टेंबरला ते वयाची चाळीशी पूर्ण करतील. विशीपर्यंत शिक्षण पूर्ण करून, पुढचे वीस वर्षे राजकीय प्रवासही लक्षणीय आहे. अर्थात, त्यांना राजकीय वारसा आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे त्यांचे सख्खे मामा.
पण सत्यजित तांबेंच्या राजकारणाची सुरुवात झाली ती अहमदनगर जिल्हा परिषदेतून. ‘झेडपीचा सदस्य’ हे त्यांचं राजकारणातलं पहिलं शासकीय पद. या पदापर्यंत पोहोचण्यापूर्वी ते काँग्रेसचे सदस्य, विद्यार्थी संघटनेचे पदाधिकरी होतेच.
नगरमधल्या संगमनेरमध्ये डॉ. सुधीर तांबे आणि दुर्गाताई तांबे यांच्या पोटी सत्यजित तांबेंचा 1983 साली जन्म झाला. तांबे कुटुंब अत्यंत उच्चशिक्षित. त्यांच्या आई दुर्गाबाई या स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांचे कन्या. त्यामुळे असा दणकट वारसा सत्यजित तांबेंना आहे. पुणे विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर सत्यजित तांबे पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. हॉर्वर्ड केनेडी स्कूलमधून व्यवस्थापनशास्त्र आणि राज्यशास्त्रात सत्यजित तांबेंनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि मायदेशी परतले.
2000 साली सत्यजित तांबेंनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला ते काँग्रेसचे सदस्य आणि नंतर भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) चे सदस्य होते. 2000 ते 2007 या काळात ते NSUI चे महाराष्ट्र सरचिटणीस होहेत. मात्र, त्यांच्या खऱ्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली, ती 2007 साली. कारण या वर्षी ते अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य झाले आणि याच वर्षे ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीसही बनले. सत्यजित तांबेंचं यावेळी वय होतं 24 वर्षे.
जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी होणारे ते तरुण सदस्य ठरले होते. 2017 पर्यंत ते जिल्हा परिषदेत कार्यरत होते. जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात सत्यजित तांबेंनी ‘वॉटर एटीएम’ नावाची संकल्पना राबवली होती. एक रुपयात 5 लिटर पिण्याचं शुद्ध पाणी असं या योजनेचं स्वरूप होतं.
सत्यजित तांबेंचं ‘सुपर’ मिशन
2007 साली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस बनलेले सत्यजित तांबे पुढे 2011 साली प्रदेश उपाध्यक्ष बनले. 2018 साली झालेल्या प्रदेशाध्यक्ष निवडणुकीत त्यांनी अमित झनक आणि कुणाल राऊत यांचा पराभव केला. काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात असताना सत्यजित तांबेंच्या हातात युवक काँग्रेसची धुरा आली होती. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर त्यांच्या नेतृत्त्वाकडे सगळ्यांचं लक्ष होतं.
‘सुपर 60’ आणि ‘सुपर 1000’ या त्यांच्या प्रकल्पांनी काँग्रेससह संपूर्ण राजकीय वर्तुळानंही लक्ष वेधून घेतलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी ‘सुपर 60’ प्रकल्प सत्यजित तांबेंनी राबवला गेला. 2014 साली काँग्रेस ज्या विधानसभा मतदारसंघात पराभूत झाली होती, त्यातील 60 मतदारसंघांत युवक काँग्रेसनं मिशन स्वरूपात काम केलं.
युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र सरचिटणीस स्नेहल डोके-पाटील यांच्या माहितीनुसार, “हा प्रकल्प यशस्वी झाला होता. कारण या प्रकल्पाअंतर्गत युवक काँग्रेसनं निवडलेल्या जागांपैकी 28 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. अमित झनक, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख यांचे मतदारसंघही या ‘सुपर-60’ मध्ये होते.”
‘सुपर-1000’ हे आणखी एक मिशन सत्यजित तांबेंनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आखला होता. या मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील ज्या तरुणांना राजकारणात विविध पदांवर काम करायचं आहे, त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची सोय युवक काँग्रेसनं करून दिली.
सांगली-कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरावेळी युवक काँग्रेसच्या जवळपास 5 हजार जणांना पूरग्रस्त भागात पाठवून मदत करण्याचं काम असो वा कोव्हिड काळात वॉररूम स्थापन करून हेल्पलाईन चालवणं असो, असे उपक्रमही तांबेंनी त्यांच्या कार्यकाळात राबवले. तसंच, तांबेंच्या नेतृत्त्वाच्या काळातच तृतीयपंथीय सारंग पुणेकर या युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या बनल्या. तसंच, लॉकडाऊनच्या काळात युवक काँग्रेसनं जवळपास 500 तृतीयपंथीयांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली होती.